पिंपरी – करोनाकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना भारतात नव्याने रुजू झाली. याच काळात मूनलाइटिंग अर्थात एकाच वेळी दोन कंपन्यासाठी काम करण्याचे प्रकार देखील समोर आले. बेकायदेशीर रित्या आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अनेक आयटीयन्सने मूनलाइटिंग सुरू केले. या प्रकारांनी कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी आता थेट पीएफ अकाउंटला आधार धरत क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केले. पीएफ अकाउंटचे मागील काही वर्षांचे स्टेटमेंट तपासले जाते. यात जर कर्मचार्याच्या खात्यात एकावेळी दोन कंपन्यांचा पीएफ जमा झाला असेल तर तातडीने कारवाई केली जाते. यात अनेकांचे करियर धोक्यात आले आहे. यामध्ये गव्हासोबत किडेसुद्धा भरडले जात असून नोकरी बदलताना लहान-लहान चुका करणार्या तरुणांना देखील याचा फटका बसत आहे.
करोनाकाळात भारतीय आयटी कंपन्यामध्ये कामाचे प्रमाण वाढले होते. आयटी कंपन्यांना अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत होती. या काळात सर्व काही ऑनलाइनच सुरू होते. घरी बसून आयटीयन्स काम करत होते. याच संधीचा फायदा घेत मूनलाइटिंग अर्थात एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम सुरू केले. तर काहींनी दोनपेक्षाही अधिक कंपन्यांसाठी काम सुरू केले. आयटी कंपन्या विदेशातील कंपन्यांसाठी काम करतात. प्रोजेक्टसाठी लागणार्या मनुष्यबळाची संपूर्ण माहिती क्लाइंटला द्यावी लागते, यामुळे आयटी कंपन्यांना सर्व नियम पाळून काम करावे लागते. आयटी कंपन्या आपल्या प्रत्येक कर्मचार्याचा पीएफ जमा करतात. या कायदेशीर बाबींचा मूनलाइटिंग करणार्या आयटीयन्सने विचारच केला नाही. दोन-दोन कंपन्यांचे पीएफ जमा होऊ लागले. आता हीच पीएफ हिस्ट्री पितळ उघड पाडत आहे. मूनलाइटिंग करणार्या कर्मचार्यांना कोणतीही नवीन कंपनी नोकरी देण्यास उत्सुक नसल्याचे अनेक घटनांवरुन दिसून येत आहे.
कंपन्यांचे कडक धोरण
करोनाकाळानंतर सर्व काही सुरळीत झाले. परंतु त्यानंतरही आयटीयन्स वर्कफ्रॉम होमचा आग्रह सोडत नव्हते. कित्येक जणांनी वर्क फ्रॉम होम ची सुविधा नसल्यास नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मूनलाइटिंगचे वाढते प्रस्थ पाहता कंपन्यांनी विविध पातळीवर तपास हाती घेत अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यास सुरुवात केली आहे. आता या कर्मचार्यांना दुसरी नोकरी मिळणे देखील अवघड झाले आहे. दोन पगारांसाठी आपल्या मूळ कंपनीसोबत केलेली बेईमानी आता अनेकांना चांगलीच महागात पडत आहे.
मूनलाइटिंग न करताही बसतोय फटका
मूनलाइटिंग न करतानाही अनेक तरुणांना पीएफ अकाउंट व्हेरिफिकेशनचा फटका बसताना दिसत आहे. कंपन्या तीन ते चार वर्षांपर्वूीचेही रेकॉर्ड तपासत आहेत. या दरम्यान एक नोकरी सोडून दुसरी नोकरी जॉइन करताना केलेल्या चुका महागात पडत आहेत. अनेकदा तरुण सुट्ट्या शिल्लक असल्यामुळे सुट्ट्या घेत पहिल्या कंपनीचा नोटीस पिरीयड पूर्ण करण्यापूर्वीच दुसरी कंपनी जॉईन करतात. अनेकदा नवीन कंपनी लवकर रुजू होण्याचा आग्रह करते. अशावेळी दोन्ही कंपन्या पीएफ जमा करतात. काही प्रकरणांमध्ये तरुण नवीन कंपनीचे जॉइनिंग लेटर स्वीकारतात परंतु जॉइन करत नाहीत. काहीजण जॉइन करतात परंतु काम पसंत न पडल्यास दुसरी ऑफर असल्यास तातडीने ही कंपनी सोडून दुसरी कंपनी जॉइन करतात. अशा प्रकारांमध्ये कंपनीने सर्व औपचारिकता पूर्ण केलेली असते आणि दोन्ही कंपन्यांचा पीएफ जमा होतो. अशा प्रकरणांमध्येही कंपनी कर्मचार्यांवर कारवाई करते.
मूनलाइटिंग चुकीचीच आहे, तरुणांनी यापासून दूर राहायला हवे. परंतु काही तरुणांना मूनलाइटिंग न करताही याचा फटका बसत आहे. पहिली नोकरी सोडून दुसरी नोकरी जॉइन करताना खूप काळजी घेतली पाहिजे. सर्व औपचारिकता पूर्ण करुन नोकरी सोडणे आणि दुसरी जॉइन करणे या प्रक्रिया केल्या पाहिजेत. पीएफ कार्यालयाने देखील याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर दोन कंपन्यांचे पीएफ जमा होत असतील तर त्याबाबत नोटीफिकेशन संबंधित कंपन्यांना आणि कर्मचार्याला पाठविले पाहिजे.
– पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज, महाराष्ट्र