“सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचे काय?”

मुंबई – राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनसह काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. एकप्रकारचा हा अघोषित असाच लॉकडाऊन आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

राज्य सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य द्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतली. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांचा निर्णय मान्यच करावा लागेल. 

मात्र, त्यासोबतच देवेंद्रजींनी ज्या सूचना केल्या, त्या मान्य करुन मुख्यमंत्री राज्य सरकारने दिलेल्या वीजतोडणीच्या आदेशाला स्थगिती का देत नाहीत ? तसेच राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षावाले आदी घटकांचे जे नुकसान होणार आहे, त्यासाठी आर्थिक मदत का जाहीर करत नाही ? 

ते पुढे म्हणाले की, केरोनापासून जनतेचं रक्षण करण्याला सरकारची प्राथमिकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, करोनापासून जनतेचं रक्षण करता करता, रोजगार बुडाल्याने भूकबळीने मृत्यू झाला, तर त्याला कोण जबाबदार ?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.