पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कर्वे रस्त्यावरून डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत सहभागी झाले होते.
कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटकपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
खंडुजीबाबा चौकात शहराध्यक्ष धीरज घाटे, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. पदयात्रेचा समारोप झाल्यानंतर मोहोळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुनील कांबळे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, नीलम गोऱहे आमदार माधुरी मिसाळ,
सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहराक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांनी ज्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कर्मभूमी म्हणून ओळखली जाते, अशा पुण्यासारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरात महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मनापासून आनंद झाला आहे. – मुरलीधर मोहोळ