#ArnabGoswami : सरकारने सूडबुध्‍दीने कारवाई केली – नारायण राणे

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामींना बेड्या ठोकल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे.  

अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यातच  माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सरकारने सूडबुध्‍दीने ही कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केलं आहे.

नारायण राणे म्हणतात, “राज्‍यात बलात्‍कारी, खुनी, अतिरेकी यांच्‍यावर कारवाई नाही. एकदा चौकशी दप्‍तरी दाखल झालेल्‍या प्रकरणात अर्णब गोस्‍वामी यांना अटक का? सरकारने सूडबुध्‍दीने ही कारवाई केली असून अर्णब गोस्‍वामी आणि कंगना राणावत यांना देण्‍यात आलेल्‍या वागणुकीचा मी निषेध करतो”.

पुढे ते म्हणतात, “या सरकारला जनहितासाठी राज्‍य चालविण्‍यात संपूर्ण अपयश आले असून अधिकाराचा स्‍वार्थी दुरुपयोग केला जात आहे. कायद्याची जाण आणि अंमलबजावणी करण्‍याची क्षमता ज्‍यांच्‍यामध्‍ये नाही त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्‍यांना बदनाम करु नये”, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.