जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने गिरीश महाजन यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेली माहिती अशी की, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर गिरीश महाजन यांनी स्वत: जखमी तरुणाला मदत केली.