मुंबई – आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या प्रसारण हक्कांचा जसा लिलाव केला जातो त्याच प्रकारे मुंबईत सध्या मादकद्रव्य विरोधी ब्युरो म्हणजेच एनसीबी मार्फत चित्रपटसृष्टीतील लोकांची जी चौकशी केली जात आहे, त्याच्या प्रसारण हक्कांचाहीं लिलाव सरकारने करावा.
मोदी सरकारने ईडी, सीबीआय आणि एनसीबी यांच्या चौकशीच्या प्रसारण हक्कांचाही लिलाव केला तर भाजपचे आर्थिक आणि राजकीय असे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात अशी उपरोधिक सूचना कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
नाही तरी सध्या या चौकशीचे अप्रत्यक्ष प्रक्षेपण सुरूच आहे. त्या प्रक्षेपणाचे हक्क दूरचित्रवाणी वाहिन्यांना लिलाव करून विकले तर भाजप सरकारला मोठा निधी मिळू शकतो असेही त्यांनी उपरोधाने सुचवले आहे.
सध्या देशापुढील महत्वाचे प्रश्न सोडून मुंबईत चित्रपटसृष्टीशी संबंधीत लोकांच्या चौकशीवरच प्रसार माध्यमांनी नको इतका भर दिला आहे. त्या विषयी देशभर उद्विग्नता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी ही उपरोधिक सूचना करून भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.