पुणे – करोनामुळे मार्चपासून कुस्ती स्पर्धा पूर्णतः बंद असून कुस्तीपटूंचा एक हंगाम अक्षरशः वाया गेला आहे. सर्वसाधारणपणे पुढील हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. यंदा, मात्र कुस्तीचा हा हंगाम सुरू होण्याची शक्यता कमीच असून एकंदरीतच करोनापुढे कुस्ती खेळच चितपट झाला आहे. यातून या खेळाचे अर्थकारणही बिघडल्याने
कुस्तीपटूवर उपासमारीची वेळ आहे.
कुस्तीपटूंना आपली शरीरयष्टी राखण्याकरिता प्रत्येक महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांचे हाय प्रोटिन डायट लागते. परंतु, स्पर्धाच होत नसल्याने कुस्तीपटूंना बक्षिसरूपी मिळणारी रक्कम बंद झाली त्यांना मोठ्या आर्थिक चणचणीला समोरे जावे लागत आहे. कोल्हापूरच्या गंगवेश तालीमचा सचिन जामदार याबाबत म्हणाला की, योग्य आहार आता परवडत नाही. करोना होईल या भीतीमुळे प्रॅक्टिस सेशनला जोडीदारही मिळत नाही. सहा महिन्यांपासून नुसते बसून असून आहे. नोव्हेंबरपासून पुढील हंगाम सुरू होण्याची शक्यता खूपच कमी असल्याने उपजीविकेचा प्रश्न आहे.
1982चा कॉमन वेल्थ गोल्ड मेडलिस्ट राम सारंग म्हणाला की, कुस्ती हा कॉंटॅक्ट स्पोर्ट (संपर्क खेळ) असून करोनामुळे तो खेळणे धोकादायक आहे, हे आम्ही जाणतो. मात्र, म्हणून हा खेळ बंद ठेवत खेळाडूंवर संक्रात येता कामा नये. अनेक कुस्तीपटूंची आर्थिक परिस्थिती बेताची असून केंद्र व राज्य सरकारने अशांना हेरून त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.