मुंबई – मुंबईत भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहावयास मिळाले. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. पेगॅसस हेरगिरीच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आंदोलनासाठी दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्तयांत राडा झाला.
पेगॅसस हेरगिरीच्या मुद्द्यावरुन आज दुपारी कॉंग्रेसचे कार्यकर्ते दादर येथील भाजप कार्यालयासमोर आंदोलनासाठी एकत्र जमले. कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते आणि नेतेही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आधीच होता. मात्र, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होते.
या आंदोलनात कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे सुद्धा उतरले होते. तर भाजपचे नेते प्रसाद लाड हे सुद्धा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.