बीड – केज तालुक्यातील मांगवडगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. तर सात जणांची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सुनाविला.
सचिन निंबाळकर, पिंटू निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेभाऊ निंबाळकर, जयराम निंबाळकर अशी जन्मठेप सुनाविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांगवडगाव येथील जमिनीच्या वादातून पारधी समाजाचा आणि गावातील एका कुटुंबाचा वाद होता. निंबाळकर कुटुंबातील एकाने बाबू पवार यास 2006 साली मारहाण केली होती. या वादग्रस्त जमिनीचा निकाल बाबू पवार याच्या बाजूने लागला होता.
या निकाल लागल्यानंतर 13 मे 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास बाबू पवार, मुले, सुना असे सर्व जण जमिनीचा ताबा घेण्यासाठी घटनास्थळी गेले. पवार कुटुंब जमिनीचा ताबा घेत असल्याचे समजताच पवार कुटुंबावर शस्त्रासह दगडाने हल्ला चढवण्यात आला.
या वेळी दोन्ही कुटुंबाकडून मोठी मारहाण करण्यात आली. यावेळी पवार कुटुंबातील व्यक्तीच्या अंगावर ट्रॅक्टरही घालत जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये बाबू पवार, संजय पवार, प्रकाश पवार या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दादूली पवार, धनराज पवार, सुरेश पवार, शिवाजी पवार, संतोष पवार हे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युसुफवडगाव पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल धस यांनी न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. या प्रकरणी सोळा जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.