मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचा उल्लेख बेडूक असा केला होता. त्यावर आज राणेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला. आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर निशाणा साधला आहे.
काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा वापर केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावे गाजावाजा केला. मात्र सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवले. बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसला आहात, चंद्राकांत पाटील यांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातुन सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग? pic.twitter.com/x965RH2gBr
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) October 26, 2020
तसेच, ज्यांच्या स्मारकासाठी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुम्चा हा सगळा आटापीटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलत असतं, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.