मुंबई – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात ‘एनआयए’ने ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित एका व्यक्तीला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून अटक केली. आकिफ आतिक नाचान असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून “इसिस’च्या कथित मोड्युल प्रकरणी अटक करण्यात आलेला तो सहावा संशयित आहे. “इसिस’च्या घातपाती कारवायांसाठी स्फोटके तयार करणे आणि त्याच्या चाचण्या घेण्याचा आरोप त्याच्यावर आहे. याशिवाय “इसिस’च्या दोन हस्तकांसाठी आश्रयाची व्यवस्था करण्याचाही आरोप त्याच्यावर असल्याचे “एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण यांच्या सहकार्याने इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या प्रचारात आकीफ सक्रियपणे सहभागी असल्याचे आढळून आले आहे. यासर्वांना अलिकडेच पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. यांच्यासमवेत काही संशयितांनाही अटक करण्यात आली आहे.
“सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे फरार होते आणि एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात “एनआयए’ने त्यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते. “एनआयए’ने ठाण्याच्या भिवंडीमध्ये छापे टाकल्यानंतर आकीफला पकडले. या छाप्यांदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि कागदपत्रे यासारखे गुन्हेगारी स्वरुपाचे काही साहित्य जप्त करण्यात आले. आकीफने इम्रान आणि युनूस यांना पुण्यातील कोंढवा येथील घरात राहण्याची सोय केली होती आणि 2022 मध्ये कोंढवा येथे बॉम्ब बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या आणि त्यात भाग घेतला होता, असे “एनआयए’ने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील “इसिस’च्या कथित मॉड्यूलबाबत “एनआयए’ ने या वर्षी जूनमध्ये गुन्हा नोंदवला होता. “एनआयए’ने गेल्या महिन्यात मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा, ठाण्यातून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला आणि डॉ अदनान सरकार यांना पुण्यातील कोंढवा येथून अटक केली होती.