चेन्नई – हिंदी भाषेचा स्विकार करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आग्रह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी धुडकावून लावला आहे. आम्ही हिंदीचे गुलाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे संसदेच्या अधिकृत भाषा समितीच्या 38 व्या बैठकीदरम्यान हिंदीला स्वीकारण्याची गती कमी असली तरीही विरोधाशिवाय हिंदी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. हिंदीची इतर भाषांशी स्पर्धा नाही आणि सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच देश सशक्त होईल, असेही शहा म्हणाले होते.
मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी स्वीकृतीसाठी केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करतो. गैर-हिंदी भाषिकांना वश करण्याचा हा निर्लज्ज प्रयत्न आहे. तमिळनाडूने कोणत्याही प्रकारचे हिंदी वर्चस्व आणि लादणे नाकारले आहे. आमची भाषा आणि वारसा आम्हाला हिंदीचे गुलाम होऊ देणार नाही!, असे एम.के. स्टॅलिन यांनी ट्विट केले आहे.
स्टॅलिन यांनी शहा यांना कर्नाटक आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये हिंदीच्या लादण्यावर झालेल्या तीव्र विरोधाची दखल घेण्यास सांगितले. कर्नाटक, पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यांमध्ये हिंदी लादण्याला स्वयंस्फूर्तीने तीव्र विरोध झाला आहे. 1965 साली हिंदी विरोधी आंदोलनाची जाणीव केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवावी, हिंदी लादणे हे शहाणपणाचे पाऊल होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.