करोना विषाणूमुळे भारतात हाहाकार माजला असून ही दुसरी लाट सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत घातक समजली जात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार आताच्या घडीला देशभरात करोना बाधितांची संख्या एक कोटी 62 लाख 63 हजार 695 इतकी आहे तर मृत्यूची संख्या एक लाख 86 हजार 920 वर पोहोचली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जाते, म्हणूनच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देण्यात येत आहे.
करोनाची साधारण लक्षणे अजूनही ताप, खोकला, श्वास लागणे, स्नायू दुखणे आणि आखडणे अशीच वाटतात. परंतु करोना शरीराच्या ज्या भागाला पहिले लक्ष्य बनवीत आहे तो भाग म्हणजे व्यक्तीची पचन यंत्रणा.
– करोनाची सुरुवातीची लक्षणे
करोनाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे तीव्र ताप, सतत खोकला, छातीत दुखणे, फुफ्फुसावर दडपण आणि ताण, न्यूमोनिया आदी आहेत. परंतु अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार करोना विषाणूची लागण झालेल्या काही लोकांना अतिसारासारखी पहिली चिन्हे आहेत, जे पचन यंत्रणेशी निगडित आहे.
रूग्णालयात पोहोचलेल्या 48.5 टक्के रुग्णांना अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे यासारख्या पचन समस्या आहेत. या व्यक्तींना श्वसनाच्या लक्षणांपूर्वी पचन समस्यांची लक्षणे दिसली. या अभ्यासामध्ये, पचनसंबंधित लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांना मृत्यूचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे, तर पचन समस्येची लक्षणे नसलेल्यांमध्ये मृत्युदर कमी असल्याचे आढळले आहे. अशा परिस्थितीत, पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.
- संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि शेंगदाण्यासारखे फायबरयुक्त पदार्थ खाणे चालू ठेवा. जर आपल्याला पोटाची समस्या उद्भवत असेल तर खिचडी, उकडलेली भाजी, डाळ, दलिया, दही इत्यादी हलके अन्न खा. बाहेरच्या गोष्टी खाणे टाळा.
- शक्य तेवढे पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवा.
- पपई, डाळिंब, संत्री, आंबा, पेरू, टरबूज आणि नाशपाती अशी फळे खा.
- धूम्रपान, जास्त कॅफिन आणि मद्यपान यापासून दूर रहा.
- नियमित हलका व्यायाम आणि योगासन करा.