Barasu Refinery Project – बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांना बळाचा वापर करून हटवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाचा वापर केल्याचा आरोप फेटाळून लावला असला तरी पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज तसेच आश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करत असल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आत राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी, पोलीस आंदोलकांना हुसकावून लावत असल्याचा व्हिडीओ ट्विट करत, चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांना केले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
याबाबत ट्विट करताना सुप्रिया सुळे यांनी, “कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलीसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते.शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा.” अशी भूमिका मांडली.
प्रकल्प बळजबरीने लादण्याचा प्रयत्न नको । Supriya Sule on Barasu Refinery Project
“स्थानिकांवर कोणताही प्रकल्प बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करु नये. स्थानिकांचे म्हणणे विचारात न घेणे हे योग्य नाही. याबाबत मंत्रीमंडळातील सदस्यांनी एकत्र बसून तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.” ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी बळजबरी करण्यात येऊ नये अशीही भूमिका मांडली.
कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलीसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते.शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा… pic.twitter.com/SCazawos7N
— Supriya Sule (@supriya_sule) April 28, 2023
अजित पवार म्हणतात… | Ajit Pawar on Barasu Refinery Project
दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतली असली तरी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भूमिका सौम्य असल्याचेच पाहायला मिळाले. अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा, ‘विकासाला विरोध नाही, पर्यावरणाचा ह्रास नको’ अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी या प्रकल्पविरोधात आक्रमक भूमिका घेणार नसल्याचेच दर्शवले.