जळोची – करोना आजाराने आईचा मृत्यू झाल्यामुळे सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीतील जळोची येथे घडली. मनिषा ठोंबरे असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
करोनामुळे काही दिवसांपूर्वी बारामतीतील जळोची येथील आई सरुबाई बंडा ढाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनिषा ठोंबरे या इंदापूर तालुक्यातील रेडणी येथून जळोची येथे आल्या होत्या.
शनिवार दिनांक २२ रोजी सकाळी सातच्या सुमारास घराच्या परिसरात झाडलोट करत असताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना तात्काळ उपचाराकरता दवाखान्यात हलवण्यात आले.
मात्र शहरातील विविध रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत महिलेला तीन वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे.
दुपारी तीन नंतर घरातील कुटुंबीयांना वॉशिंग मशीन जवळ फरशी खाली साप जाताना दिसला. सर्पमित्र अमोल जाधव यांना साप पकडण्यासाठी बोलावण्यात आले. सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी फरशी खाली लपलेल्या तीन फुटांचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीचा विषारी साप मोठ्या शिताफीने पकडला व वनविभागाच्या ताब्यात दिला.
वन कर्मचाऱ्यांनी सदर विषारी सापाला निर्जन स्थळी निसर्गात सोडले.