पुणे – सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या एकास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन सांबराची शिंगे, एक ऍक्टीव्हा असा 35 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. प्रविण दिलीप शिंदे (25 रा. मु.पो.पिंपरखेड ता. शिरुर जि.पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट 6कडील पथक हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना आरोपी सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. तो शिंगांची विक्री करण्याकरीता ऍक्टिवा वरुन फुलगाव परिसरात येणार होता.
मिळालेल्या खबरेवरुन फुलगाव फाटा चौकात सापळा रचण्यात आला.तेथे प्रविण शिंदेला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, सांबर जातीचे प्राण्याची 3 शिंगे, 1 ऍक्टीवा मोपेड व 1 पोते असा एकुण 35 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर आरोपीविरुध्द वन्यजिव (संरक्षण) अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई.पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले,नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व करण ढंगारे यांनी केली आहे.
“प्रविण शिंदे हा मुंबई येथे एका कंपनीत काम करत होता. लॉक डाऊदमध्ये तो मुळ गावी आंबेगाव येथे आला होता. त्याला गावातील एका ज्येष्ठ नागरिकाने घरात तीन सांबराची शिंगे असून ती विकायची असल्याचे सांगितले. त्यानूसार प्रविण शिंदे ग्राहकाच्या शोधात होता. याची खबर युनिट सहाला मिळातच बनावट ग्राहक पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले.” – गणेश माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)