बेंगळुरू- पुढील वर्षीच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राजकारणाची दिशा स्पष्टपणे बदलेली असेल, असे समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी म्हटले आहे. विरोधकांच्या बैठकीसाठी ते बेंगळुरात आले असून आज ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, आमचे संयुक्त प्रयत्न त्यासाठी सुरू आहेत. त्यात आम्हाला यश येईल असे ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हेही या बैठकीसाठी बेंगळुरात आले असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विरोधकांच्या या एकीचे परिणाम आत्ताच दिसून येऊ लागले आहेत.
या एकत्रित बैठकीचा राजकीय वातावरणावर निश्चित परिणाम दिसून येईल, असा विश्वास त्यांनीही व्यक्त केला आहे. भाजपच्या विरोधात जास्तीतजास्त प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भाजपच्या विरोधातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांची दोन दिवसांची बैठक आजपासून बंगळुरात सुरू झाली आहे.