पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणूकीवरील स्थगिती उठविल्याने पुणे शहराला आणखी एक आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भागगिरे यांना विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता असून मागील दोन दिवसांपासून भानगिरे मुंबईत तळ ठोकून आहेत. दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला होता. तेव्हापासून भानगिरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष मर्जीतले असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा आहे.
माजी नगरसेवक नाना भानगिरे हे 2007 पासून शिवसेनेकडून महापालिकेत नगरसेवक होते. तर, 2014 मध्ये त्यांनी कात्रज विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत 2017 मध्ये महापालिकेत निवडून आले. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील होते. त्यामुळे, शिंदे गटाचे आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भानगिरे हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक त्यांच्या सोबत सेनेतून बाहेर पडले.
मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. तसेच भानगिरे यांच्या जवळपास सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहिले असून भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या शहर प्रमुख निवड झाल्यानंतर नव्याने समाविष्ट गावांसाठी विशेष समिती नेमणे, हडपसर मतदारसंघातील रस्ते, निवासी मिळकतींना 40 टक्के कर सवलत कायम ठेवणे, पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी भानगिरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.