दुय्यम सॅनिटायजर विक्रीतून ‘हात धुण्याचा’ प्रयत्न

तिघांविरुद्ध दत्तवाडी पोलिसांत गुन्हा : लाखाचा साठा जप्त

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये दुय्यम दर्जाच्या सॅनिटायजरची विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दत्तवाडी परिसरात कारवाई केली. यात तीन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा साठा जप्त केला. तसेच त्यांना पुरवठा करणाऱ्या कारखान्यावर मुंबईतील साकीनाका येथे छापा टाकून कंपनी सील करण्यात आली आहे.

दत्तवाडी परिसरामध्ये दुय्यम दर्जाची सॅनिटायजरची विक्री केली जात असल्याची महिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट-1च्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी दत्तवाडीत पाहणी करून सॅनिटायजर विक्रेत्यांवर छापे टाकले.

त्यानंतर “एफडीए’ पथकाने या सॅनिटीयझरची पडताळणी केली. त्यामध्ये संबंधित सॅनिटायजर दुय्यम दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी अजय जाधव, जितुसिंग वसावे, अमोल पवार, अजय थोरात, प्रकाश लोखंडे, गजानन सोनुने, तुषार माळवदकर, अशोक माने, योगेश जगताप, बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने यांच्या पथकाने केली.

गैरप्रकार करणाऱ्यांची माहिती कळवा
सॅनिटायजर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 897-528-3100 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी केले आहे.

करोनाचा फायदा उठवण्याची शक्‍कल
यातील एका व्यापाऱ्याचा अधिकृत कंपनीचे सॅनिटायजर सप्लाय करायचा व्यवसाय आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायजरचा तुटवडा सुरू झाला. हा फायदा उठवण्याची “आयडिया’ एकाच्या मनात आली. त्याने बनावट सॅनिटायझर विकून फायदा उठवण्याची “आयडिया’ दोन मित्रांना बोलून दाखवली. त्यांनीही यासाठी पैसे गुंतवले. यानंतर त्यांनी साकीनाका येथील एका उत्पादकाशी संपर्क साधला. या उत्पादकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना तो सॅनिटायजरचे उत्पादन घेत होता. त्याच्याकडून 3,200 रुपयांना पाच लिटर सॅनिटायजर असे अनेक लिटर सॅनिटायजर विकत घेण्यात आले. यानंतर हे सॅनिटायजर दोन नामांकित कंपन्यांच्या नावाने 50, 100 आणि 200 मिली बॉटल्समध्ये किरकोळ दुकानदारांना विकण्यात येत होते. मागील तीन दिवसांपासून ते याची विक्री करत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.