नवी दिल्ली – दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याबाबत तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात एका जाहिरात कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. गोवा निवडणुकीदरम्यान दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात कमिशनचे पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैरियट प्रॉडक्शन मीडिया प्रा. लिमिटेडचे संचालक राजेश जोशी यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असतान 13 फेब्रुवारीपर्यत कोठडी सुनाविण्यात आली आहे.
तसेच मद्य उत्पादन आणि वितरण कंपनी ओएसिस ग्रुपचे संचालक गौतम यांना मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर व्यावसायिकाला कार्टेलायझेशनच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली.
दरम्यान, ईडीने शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांचा मुलगा आणि पंजाबमधील व्यापारी गौतम मल्होत्रा याला मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली. तसेच सीबीआयने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता हिचा आधीचा चार्टर्ड अकाउंटंट बुचीबाबू गोरंटला याला देखील याच प्रकरणात हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.