ब्रुसेल्स – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी आज युरोपिय संसदेला संबोधित केले आणि रशियाविरोधात लढण्यासाठी अधिक शस्त्रांची मागणी केली. रशियाविरोधातल्या संघर्षामध्ये युक्रेनबरोबर युरोपिय संघदेखील सहभागी आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. कारण या युद्धामध्ये युरोपविरोधी शक्ती संघर्ष करत आहेत, असे झेलेन्सकी म्हणाले.
युरोपिय संसदेच्या सदस्यांनी झेलेन्सकी यांना भाषण सुरू होण्यापूर्वी आणि भाषण समाप्त झाल्यावर उभे राहून मानवंदना दिली. झेलेन्सकी यांनीही भाषणाच्या अखेरीस हातात युरोपिय संसदेचा ध्वज घेऊन सदस्यांच्या अभिवादनाचा स्विकार केला.
जोपर्यंत आपण सर्व जण एक आहोत आणि जोपर्यंत आपण युरोप म्हणून आपल्या जीवन पद्धतीच्या रक्षणाचा प्रयत्न करत आहोत, तोपर्यंत युरोप केवळ युरोप म्हणूनच अस्तित्वात राहू शकेल. रशियाला युरोपची जीवन पद्धती नष्ट करायची आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असे देखील झेलेन्सकी म्हणाले.
झेलेन्की यांच्या भाषणापूर्वी युरोपिय संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मोत्सोला यांनी युरोपिय संसदेच्या सदस्यांना युक्रेनला शस्त्रांची आणि लष्करी मदत करण्याचे आवाहन केले. विशेषतः लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने युक्रेनला उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा जेवढा धोका युक्रेनला आहे, तेवझाच धोका अन्य देशांनाही असल्याचे मानायला हवे, असेही मोत्सोला म्हणाले.
#RussiaUkraineWar : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी अचानक ब्रिटनच्या दौऱ्यावर; तातडीने महत्वाची शस्त्रे…
रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध सुरू होण्याला एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभुमीवर झेलेन्सकी यांनी संपूर्ण युरोपाकडे लष्करी मदत मागितली आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्सक प्रांत आता रशियाच्या ताब्यात आहे आणि आता युक्रेनच्या अन्य प्रांतांवरही रशियाच्या फौजा ताबा मिळवण्यासाठी जोरदार आक्रमण करत आहेत.