पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने करोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेनेने सोमवारी(दि.24) पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले.
शहरात फिरत्या हौदांची कुठेही व्यवस्था केली नाही, मूर्तीदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन यामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. त्यावर, आज संध्याकाळपर्यंत मूर्तीदानाबाबत प्रभागनिहाय पालिकेचे नियोजन व अधिकारी वर्गाच्या जबाबदाऱ्या जाहीर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विश्वजित बारणे, सरिता साने, अजित तुतारे, संतोष सौंदणकर, बाळासाहेब वाल्हेकर, अभिजीत गोफण, हरेश नखाते, ज्ञानेश्वर शिंदे, शर्वरी जळमकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
पालिका प्रशासनाकडून अतिशय गलथान कारभार सुरु आहे. पालिकेने विसर्जन घाट पत्रे लावून बंद केले आहेत. शहरात फिरत्या हौदांची कुठेही व्यवस्था नाही. पालिकेने गणेशोत्सावकडे अक्षम्य पद्धतीने दुर्लक्ष केले. कसलेही नियोजन केले नाही. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती शहरप्रमुख योगेश बाबर यांनी दिली.