कात्रज-धनकवडीत 36,421 मूर्तींचे विसर्जन रात्री 12च्या आत डीजे बंद
कात्रज/धनकवडी – कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात रिमझिम पावसात गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका उत्साही वातावरणात निघाल्या होत्या, पारंपरिक ढोल, ताशा, बॅंड पथकाच्या निनांदात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाला निरोप दिला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीतील कात्रज-धनकवडी परिसरातील सार्वजनिक मंडळे व सोसायटींसह मंडळांनी पारंपारिक वाद्य वाजवत गणरायाचे विसर्जन केले. सार्वजनिक मंडळ, सहकारी सोसायटी तील गणपती, घरगुती गणेश मूर्ती अशा एकूण 36 हजार 421 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मिरवणूक शांततेत पार पडल्या. रात्री 12:00च्या आत सर्व मंडळांनी वाद्य बंद केली होती.
कात्रज परिसरात साईनाथ मित्र मंडळाने आकर्षक फुलांची आरास केलेला रथ यांच्यामार्फत ढोल ताशाच्या गजरामध्ये दुपारीत विसर्जन करण्यात आले. सुदर्शन मित्र मंडळ यांचा आकर्षक फुलांनी सजवलेला रथ व डीजे याचबरोबर, कात्रज गावठाणाचा अजिंक्य भैरवनाथ मित्र मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने बाल वारकऱ्यांच्या समवेत निघाली. प्रभात मित्र मंडळाने धनकवडीच्या रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. तसेच, पारंपरिक ढोल-ताशा पथकाच्या निनादात दुपारीच बाप्पाची मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधले.
मंडळांचे सहकार्य….
आदर्श मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, राणा प्रताप मित्र मंडळ, जयनाथ मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, अखिल चैतन्य नगर मित्र मंडळ, वनराई कॉलनी मित्र मंडळ यांच्यासह अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून गणेश भक्तांचे लक्ष वेधले. भारती विद्यापीठ पोलीस व सहकारनगर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यास मंडळांनी सहकार्य केले.
एकूण 43 टन निर्माल्य…
धनकवडी सहकार नगर सहाय्यक आयुक्त कार्यालय तर्फे सहा ठिकाणी बांधलेले हौद आणि 26 ठिकाणी लोखंडी टाक्या, तसेच सात विसर्जन हौदाची सुविधा गणरायाच्या विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. कार्यालयातर्फे ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामार्फत एकूण 43 टन निर्माल्य गोळा करण्यात आले.