Amol kolhe : राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले. आज देखील बारामतीमधील गोविंदबागेत अजित पवार अनुपस्थितीत होते. यातच आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावरून आता राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला आले होते. पवार वळसेंच्या भेटीनंतर अजित पवार शरद पवारांची भेट झालेली. त्यानंतर अजित पवार अमित शहांच्या भेटीला पोहचले होते. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे. मात्र ही भेट दिवाळीनिमित्त झाल्याचे बोलले जात आहे.
आज मंचर येथे सहकार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील साहेबांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!@Dwalsepatil pic.twitter.com/RAUJrv68ww
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 14, 2023
याबाबत अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. “आज मंचर येथे सहकार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील साहेबांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!” असे अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतल्याने यावरून तर्क- वितर्क लावले जात आहे.