खालापूर, (वार्ताहर) – मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ५० फूट खड्ड्यात कोसळून अपघात झाला. ही घटना कुंभिवली गावाजवळ मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.
मनीषा बर्वे (वय 40), सोनाली बर्वे (वय 35), दिवेश बर्वे (वय 21) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर सुमन बर्वे (वय 68), चालक संदीप दिलीप बर्वे (वय 48), अश्वजीत बर्वे (वय 13), प्रणव बर्वे (वय 5), आदेश बर्वे (वय 3), अनिकेत बर्वे (वय 19), प्रिया बर्वे (वय 18), गौरव बर्वे (वय 17), कियारा बर्वे (वय 6 महिन, सर्व रा. डोंबिवली जि. ठाणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक संदीप दिलीप बर्वे पुणे येथून देवदर्शन करून डोंबिवलीकडे येत असताना अति वेगाने कार अनियंत्रित होऊन द्रुतगती मार्गावरील डाव्या साईडची रेलिंग तोडून रस्त्याच्या खाली 50 फुट खड्ड्यात खाली पलटी झाली. जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आलेले आहे.
सदर अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूकीला कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही, अपघातस्थळी पोलीस निरीक्षक गौरी मोरे भेट देऊन बचावकार्यात मदत केली.