पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड येथील कृष्णा हॉस्पिटलनजीक गल्ली क्रमांक तीन येथे एका इमारतीच्या मागच्या बाजूस झाडावर एक व्यक्ती चढली आणि बेशुद्ध होऊन झाडावरच अडकल्याची घटना मंगळवारी दुपाारी चार वाजता घडली. ही माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन केंद्रातील गाडी व मुख्यालयातून रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती. त्यांनी या व्यक्तीची सुटका केली.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध एक व्यक्ती सुमारे पस्तीस फूट उंचावर अडकल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवान दलाकडील शिडी लावून झाडावर गेले आणि त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे जाणवले. त्याच वेळी तातडीने दोरीचा वापर करून रेस्क्यू बेल्टच्या साह्याने, तसेच व्यक्तीचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करून हळूहळू व कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटांत झाडावरून खाली उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रवींद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी सहभाग घेतला.