मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – शिरूर लोकसभेच्या मैदानात शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शड्डू ठोकले आहेत. हे कसलेले मल्ल आता आमने सामने उभे ठाकल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांची घरवापसी करीत चौकोनी परीघ पूर्ण केला आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची झाली आहे. यात त्यांचा कस लागला असल्याने पहिल्याच टप्प्यात अटीतटीची लढाई पोहोचली आहे,
शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वाट्याला आल्याने शिरूर लोकसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी खासदार आढळराव यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. नुकतीच राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी आढळराव पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रव पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी जाहीर केली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याबरोबर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. परंतु शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी मात्र शरद पवार यांच्याशी निष्ठावंत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शिरूर लोकसभा ही शरद पवार व अजित पवार यांच्या प्रतिष्टेची बनली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघातील 4 आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत. तर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते हे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. हे कागदावरचे बलाबल आढळरावांसाठी दिलासादायक आहे.
मूड ऑफ कोणाच्या पथ्यावर
शिरूर लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने शिरूरची महायुतीची जागा जरी राष्ट्रवादीला आली असली तरी पक्षाला आयात उमेदवार द्यावा लागला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मूड ऑफ झाल्याचे दिसून येत आहे. आढळरावांना शिवसेना युतीत असूनही उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधावे लागल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा मूड ऑफ आहेत. भाजपकडून ज्या राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या नावाखाली एवढे दिवस आरोप केले जात होते. त्याच भाजप कार्यकर्त्याना घड्याळाचा प्रचार करावा लागणार असल्याने त्यांचाही मूड ऑफ आहे. आता या मूड ऑफचा फायदा डॉ. अमोल कोल्हेना किती होतो, हे महत्वाचे मानले जात आहे.
बांदलांमुळे धांदल होणार
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल हे शिरूर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. बांदल यांनी यापूर्वी केंदूर -पाबळ जिल्हा परिषद, शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे, तळेगाव ढमढेरे -रांजणगाव सांडस जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या असल्याने परिसरात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे बांदल नक्की काय भूमिका घेतील. त्यांची भूमिका नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे अनेकांच्या नजरा लागून आहे.