Sangli Lok Sabha Election 2024 – सांगली लोकसभा मतदारसंघ सद्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. या लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाट्यपूर्ण घडामोडी होत आहेत. कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने या ठिकाणी तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत होत आहे.
त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे विशाल पाटील यांचे पारडे जड झाल्याची बोलले जात आहे. वंचितकडून प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढून घेण्यात आला असून या ठिकाणी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यामुळे सांगली लोकसभेचे गणित बदलणार अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.
कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा तिरंगी सामना होणार हे स्पष्ट झाले.
मागील 2019 च्या निवडणुकीत देखील तिरंगी सामन्याचा फटका विशाल पाटलांना बसला होता. त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरीकडून लढले होते. वंचितकडून गोपीचंद पडळकरांनी तब्बल 3 लाख मते घेतली. विशाल पाटील 1 लाख 64 हजार 352 मतांनी पराभूत झाले होते.
..त्यामुळे विशाल पाटलांचे बळ वाढणार?
नाट्यपूर्ण घडामोडींनंतर आता सांगलीत विशाल पाटलांचे बळ वाढले आहे. मागील निवडणुकीत सांगलीत वंचितने 3 लाख मते घेतली होती. तर विशाल पाटलांना ३ लाख ४४ हजार ६४३ मते मिळाली होती. त्यामुळे वंचितचा पाठिंबा विशाल पाटील यांच्यासाठी गेमचेंजर ठरु शकतो.