मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार मी मागेल ते मंत्रिपद द्यायला तयार होते. पण मी स्पष्ट नकार दिला. कारण, 83 वर्षांच्या बापाला सोडून जाणे हे योग्य वाटले नाही. त्यामुळे अजित पवार गटात जाण्यास मी स्पष्ट नकार दिला. मला प्रफुल्ल पटेल यांचे सतत फोन येत होते. पक्षाच्या जितक्या बैठका झाल्या, त्यात भाजप सोबत जायचे नाही, हीच भूमिका मी मांडली, असे स्पष्ट करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले.
कर्जतमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या वैचारिक मंथन शिबिरातून अजित पवारांनी देशमुख आमच्यासोबत येणार होते, असा गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, 2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदारांनी पक्षात बंड करून सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचे उघड झाले. आता शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याची पक्ष आणि चिन्हासाठी लढाई सुरू आहे.