बेंगळुरू – बेंगळुरूमधील अठ्ठेचाळीस खाजगी शाळांना शुक्रवारी सकाळी त्यांच्या आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला, त्यामुळे कर्मचारी आणि पालकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे पोलिस यंत्रणेचीही चांगलीच धावपळ उडाली.
शाळेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब या ईमेल बाबत पोलिसांना सूचित केले, पोलिसांनी तातडीने बॉम्ब निकामी पथके आणि तोडफोड विरोधी तपासणी पथके संबंधित शाळांमध्ये पाठवली. विद्यार्थी आणि कर्मचार्यांना शाळेच्या आवारातून ताबडतोब बाहेर काढण्यात आले, पोलिसांनी सांगितले की, अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि प्रथमदर्शनी असे दिसते की हा एक फसवा संदेश आहे. कोणत्याच शाळेत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. ज्या इमेल आयडीवरून हा ईमेल आला आहे त्याचा शोध घेतला जात आहे.
ई-मेलच्या धमकीची माहिती मिळताच मुलांना सुखरूप घरी परतण्यासाठी पालकांनी घाबरून आपापल्या कार्यालयातून आणि घरातून शाळांमध्ये धाव घेतली. आधीही अशीच धमकीची पत्रे आणि ईमेल शाळांमध्ये आले होते आणि ते खोडसाळपणाचे असल्याचे आढळून आले होते आणि पोलिसांनी त्यामागील लोकांना ओळखले होते आणि त्यांच्यावर कारवाईही केली होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, त्यांनी पोलिसांना ई-मेलच्या स्त्रोताचा गांभीर्याने तपास करण्यास सांगितले आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि मंदिरांना पुरेशी सुरक्षा प्रदान केली आहे.