नैरोबी – केनियामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मार्च महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत किमान ७० जण मरण पावले आहेत. सरकारी प्रवक्त्याने ही माहीती दिली. या आठवड्याच्या पूर्वार्धात मृतांचा जेवढा आकडा जाहीर केला गेला होता, त्याच्या दुप्पट आकडा आता झाला असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. (Heavy rains in Kenya)
गेल्या काही आठवड्यांपासून केनियामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे राजधानी नैरोबीमध्ये तसेच देशाच्या पश्चिम आणि मध्य भागातही पूर आला आहे. या पूरामध्ये शेकडो जण मरण पावल्याची अफवा पसरली होती. मात्र सराकरी प्रवक्त्याने ७० जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
देशातील पूरग्रस्त भागातील मदतीसाठी ४ अब्ज केनिया शिलिंग (२९ अब्ज डॉलर) इतका निधी दिल्याचे देशाचे उपाध्यक्ष रिगाथी गाचकुआ यांनी सांगितले. पूराचा फटका १ लाख ३० हजार लोकांना बसला आहे.
हजारो घरे पूरात वाहून गेली असून राजधानीतल्या ६४ शाळांमध्येही पूराचे पाणी शिरले आहे. या आठवड्याच्या अखेरीस आणखीन पाऊस होण्याची शक्यता केनियाच्या वेधशाळेने वर्तवली आहे. पूर्व आऱ्रिकेतील अन्य देशांमध्येही पूराचे थैमान सुरू असून शेजारील टांझानियामध्ये १५५ जण मरण पावले आहेत. तर बुरुंंडीमध्ये तब्बल २ लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे.