जळोची: पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचेच नेते आहेत” असे वक्तव्य केले होते. याबाबत माध्यमांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. तसेच ते पुढे म्हणाले की, “बीड येथील माझ्या सभेनंतर जर कोणी तिथे आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचे लोकशाहीमध्ये स्वागत व्हायला हवे. मला आनंद आहे की वेगळी भूमिका घेतलेले लोक त्यांची भूमिका लोकांमध्ये जाऊन मांडत आहेत.” असे म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना, वेगवेगळ्या संस्थांनी केलेले निवडणूक सर्वे याबाबत मला काही माहिती नाही मात्र आम्ही ज्या संस्थांची वा संघटनांशी बोलतो आहोत त्यामधून महाविकास आघाडीला राज्यांमध्ये चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, केंद्रामधून साखर निर्यातीच्या बंदीबाबत काही निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे भविष्यात साखरेच्या किमती कोसळण्याची शक्यता आहे, परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.