शेवगाव -शेवगाव ते भगूर रस्त्याच्या कामाला कार्यारंभ देऊन वर्ष होत आले, तरी संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना शिंदे गटाने दि. 12 ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर संबंधित ठेकेदाराने या कामाला घाईघाईने काल (रविवार) रात्री 11च्या सुमारास प्रारंभ केला. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समजताच शिवसेना शिंदे गटाने युवा शिवसेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट व शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत ते काम बंद पाडले. या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदार व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार केला.
शेवगावातील क्रांती चौक ते भगूरपर्यंतच्या रस्ताकामाला कोट्यवधीचा निधी वर्षभरापूर्वी मंजूर झाला होता. या कामाचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून लांबवले जात होते. या संदर्भात तालुकाप्रमुख डहाळे यांनी निवेदनाद्वारे दि. 12 ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर काल (रविवार) रात्री 11च्या सुमारास ठेकेदाराच्या यंत्रणेने शेवगावात दाखल होत रस्त्यावर खडी टाकून रस्तादुरुस्तीला सुरुवात केली.
मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती डहाळे यांना समजताच त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह काम बंद करण्याची मागणी करून काम सुरू असलेल्या खड्ड्यातच ठिय्या मांडला,तसेच जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडले. या वेळी डहाळे म्हणाले की, क्रांती चौक ते भगूर या रस्त्याचे काम शेवगावकरांच्या समाधानासाठी नसून अधिकाऱ्यांच्या समाधानासाठी केले जात आहे. ठेकेदार शेवगावकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. मात्र, शिवसेना ही धूळफेक होऊ देणार नाही. ठेकेदाराने हे काम दर्जेदार केले पाहिजे.