पिंपरी – किवळे येथे होर्डिंग कोसळून कामगारांच्या झालेल्या मृत्यूनंतर महापालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंगबाबत बोटचेपे धोरण राबवित आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात पुन्हा अनधिकृत होर्डिंग, बॅनर, होर्डिंगचे पेव फुटले आहे. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांच्या कोणताच वचक नसल्याने शहराला बकाल असे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.
17 एप्रिल 2023 मध्ये किवळेत एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने कारवाईसाठी पाऊले उचलली होती. त्यानुसार काही अनधिकृत होर्डिंग पाडून टाकण्यात आली आहेत. मात्र, आजही अनधिकृत होर्डिंग आहेत. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम होत आहेत. तसेच अनेक नव-नवीन पदाधिकारी तयार झाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची चमकोगिरी जोरदार सुरू आहे. शहराचे बहुतेक चौक मोठ-मोठ्या फ्लेक्सने भरुन गेले आहेत.
सध्या स्थानिक राजकीय मंडळींनी अनेक नव्या चेहऱ्यांना पदे बहाल केली आहेत. आता या नव्या चेहऱ्यांवर आपला चेहरा चमकविण्याची जबाबदारी या राजकीय मंडळींनी टाकली असून कोणत्याकी कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार फ्लेक्सबाजी केली जात आहे. फ्लेक्सवर नवनियुक्त पदाधिकारीच शुभेच्छक असल्याने कारवाई झालीच तर नव्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकते.
प्रशासन का हतबल झाले?
किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने बड्या-बड्या नेत्यांचे होर्डिंग देखील उतरविले होते. परंतु आता चौका-चौकात आणि गल्ली-बोळात लागलेल्या फ्लेक्सवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन राजकीय नेत्यांपुढे एवढे हतबल का झाले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.