पुणे : मुक्तांगण शाळेत पालकांचे आंदोलन
पुणे – शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांवर घृणास्पद प्रकार घडल्याने खळबळ उडाली. या घटनेचे संतप्त प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी विद्यार्थी संघटनासह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळेच्या संस्थेला जाब विचारला.
प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या काही विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर बहुतांश पालकांनी एकत्र येत सोमवारी शाळेच्या परिसरात घोषणाबाजी करीत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेत शाळा प्रशासन व दोषी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकरणी शाळा प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली.
शिवसेनेच्या वतीने संस्थेच्या कार्याध्यक्षांना घेराव घालून याप्रकरणी जाब विचारण्यात आला. दोषींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख बाळा ओसवाल, विभागप्रमुख सूरज लोखंडे, मुकुंद चव्हाण, राजेश मोरे, सचिन जोगदंडसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळा प्रशासनास मनसे कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. मनसेचे विक्रांत अमराळे, गणेश भोकरे, विनायक कोतकर, संतोष वरे, राहुल गवळी, गणेश नायकवडे, निलेश हांडे आदी उपस्थित होते. या सर्व प्रकारात शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (मीडिया विभाग) अध्यक्ष अक्षय जैन यांनी केली आहे.
गैरप्रकारास थारा नाही
शाळेचे व्यवस्थापन कोणत्याही गैरप्रकारास कधीही पाठीशी घालत नाही व विद्यार्थ्यांचे हित, सुरक्षा आणि दर्जेदार शिक्षणास प्राधान्य देते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या आवारात सुमारे 89 कॅमेरे बसविण्यात आले आहे. कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शाळा प्रशासन नेहमीच दक्ष असते. शाळेतील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.