नवी दिल्ली/मुंबई – शरद पवारांवर अनेक आरोपही अजित पवारांनी केले. यावेळी अजित पवारांनी वय 82 वर्ष, आता तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा प्रश्नही विचारला. याला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “वय 82 असो वा 92, वयाने फरक पडत नाही. मी पक्षाची पुनर्बांधणी करेन. कुणाला (अजित पवार) मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत,’ असेही शरद पवारांनी म्हटले.
दरम्यान, “पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगात योग्य तो न्याय मिळेल,’ असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच, “जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडे जाऊ,’ असे म्हणत पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचेही संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले.