पुणे -द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यातील अंतिम परीक्षेत अहमदाबादच्या अक्षय जैनने देशात पहिला क्रमांक मिळवला, तर इंटरमिजिएट परीक्षेत हैदराबादच्या वाय. गोकुळ साई श्रीकरने देशात पहिला क्रमांक पटकावला.
“आयसीएआय’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतिम परीक्षा आणि इंटरमिजिएटर परीक्षा मेमध्ये घेण्यात आली. अंतिम परीक्षा देशभरातील 477 केंद्रांवर आणि इंटरमिजिएट परीक्षा देशभरातील 549 केंद्रांवर झाली. अंतिम परीक्षेतील पहिल्या गटातील उत्तीर्णतेची टक्केवारी 11.91 आहे. अहमदाबादच्या अक्षय जैनने देशात पहिला, चेन्नईच्या कल्पेश जैन जी. या विद्यार्थ्याने दुसरा, दिल्लीच्या प्रखर वर्ष्णेयने तिसरा क्रमांक मिळवला. इंटरमिजिएट परीक्षेत हैद्राबादच्या वाय. गोकुळ साई श्रीकरने देशात पहिला, पतियाळाच्या नूर सिंगला या विद्यार्थ्याने दुसरा, मुंबईच्या काव्या कोठारी या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक मिळवला.