दुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’

20.23 टक्के मतदानात झाली वाढ ः तीन वाजेपर्यंत 49.20 मतदानाची नोंद
नगर –
विधानसभा निवडणुकीत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत 49.20 टक्के मतदान झाले. मात्र दुपारनंतर जिल्ह्यात 20.23 टक्के मतदानात वाढ झाली. काही मतदारसंघात तर मतदानाची वेळ संपल्यानंतरही दीड ते दोन तास मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्याने अनेक मतदारसंघात उशिरा झालेले मतदानच उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असल्याबाबतची चर्चा झडत होती. अचानक वाढलेल्या या मतदानामुळे प्रशासन देखील चकीत झाले आहे.

नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत एकूण 69.43 टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. सकाळी लवकरच उत्साही मतदारांनी मतदानकेंद्रांत जाऊन मतदान केले. सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्हाभरात अवघे 5.64 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानप्रक्रियेला वेग येईल, असे वाटत होते. मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंत अवघे 18.1 टक्का मतदान झाले. दोन तासांत केवळ 12.46 टक्केच मतदान वाढले. सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत मतदानाची टक्केवारी 33.73 पर्यंत पोहोचली. सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत 15.63 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. दुपारी एकपर्यंत मतदानाची गती धीमीच राहिली. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत 49.20 टक्के मतदान झाले. तब्बल सात तासांत मतदानाची टक्केवारी पन्नाशीच्या घरात पोहोचली.

दुपारी तीनपर्यंत जरी पन्नास टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान झाले असले, तरी दुपारी तीननंतर मात्र मतदारांच्या सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हाभरात 62.86 टक्के मतदान झाले. अवघ्या तीन तासांत 13.66 टक्के मतदानात जिल्हाभरात वाढ झाली. सायंकाळी पाचनंतर मतदानकेंद्रांबाहेरील रांगाही वाढल्या. त्यामुळे मतदानच्या वेळेत अनेक ठिकाणी वाढ करण्यात आली. अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी तीननंतर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारील 20.23 टक्के मतदान झाले. त्यामुळे दुपारी तीननंतर मतदानाच्या टक्‍क्‍यात झालेल्या वाढीबाबात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

कोपरगावात दुपारनंतर 26.27 टक्के वाढ

दुपारनंतर सर्वांत जास्त मतदानाच्या टक्केवारीत वाढ कोपरगाव मतदारसंघात झाली. दुपारी तीनवाजेपर्यंत कोपरगाव मतदारसंघात 49.96 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर या मतदारसंघात ती वाढून 76.23 टक्के झाली. त्यात 26.27 टक्के वाढ झाली. सर्वांत कमी वाढ अकोले व शेवगाव मतदारसंघांत राहिली. ती अनुक्रमे 15.29 व 15.56 राहिली. इतर मतदारसंघातं दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ अशी ः संगमनेर- 19.75, शिर्डी- 21.28, श्रीरामपूर-23.94, नेवासा-24.26, राहुरी- 23.06, पारने-17.33, नगर-18.75, श्रीगोंदा-19.36, कर्जत-18.99.

Leave A Reply

Your email address will not be published.