डिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड

“ऑनलाइन’ स्वरूपातही पदार्पण : “ऑडिओ’ दिवाळी अंकांचाही “ट्रेन्ड’ प्रभात वृत्तसेवा

पुणे – मराठी भाषेतील साहित्याला शंभरहून अधिक वर्षांची दिवाळी अंकांची परंपरा आहे. पुणे शहरासोबतच राज्यभरात दिवाळी अंकांना वाचक, लेखक आणि प्रकाशकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. इतकेच नव्हे, तर डिजिटल युगातही दिवाळी अंकांने वाचकांच्या मनावर आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळेच हल्ली बहुतांश लेखक-प्रकाशकांकडून “डिजिटल दिवाळी अंक’ प्रकाशित केले जात आहेत.

दसरा झाल्यानंतर दिवाळीचे वेध लागतात. बौद्धिक खुराकाचे अर्थात दिवाळी अंकाचे वाचन करणारा “पट्टीचा वाचक वर्ग’ आजही पाहायला मिळतो. दिवाळीच्या खुसखुशीत फराळाबरोबरीने कविता, लेख, कथा अशा एक ना अनेक पैलुंतील खुसखुशीत लेखन साहित्य वाचनाकडे सध्या देखील कल आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशांतही दिवाळी फराळाबरोबर दिवाळी अंक पोहोचत आहेत. दिवाळी अंकांच्या निर्मितीमध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक चढ-उतार आले. मात्र, या सगळ्यांत दिवाळी अंकांनी तग धरला आहे. दिवाळी अंकाची ही परंपरा अखंड सुरू ठेवण्यासाठी प्रकाशकांनी आता “डिजिटल अंकां’चा पर्याय निवडला आहे.

मागील चार-पाच वर्षांपासून अंक प्रकाशित झाल्यानंतर अंकाची “ई-एडिशन’ संकेतस्थळावर “अपलोड’ केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी काही प्रकाशकांनी छापील अंक प्रकाशित करण्याऐवजी “डिजिटल दिवाळी अंक’ प्रकाशित केले आहेत. केवळ “ई-एडिशन’च नव्हे, तर सध्या “ऑडिओ’ दिवाळी अंकांचा “ट्रेन्ड’ असल्याचे प्रकाशकांनी सांगितले.

दिवाळी अंक प्रकाशित करताना येणाऱ्या अडचणींचे सावट अधिकच वाढत आहे. लेखन साहित्याबाबत वाचकांची नाराजी, जाहिरातींचे घटते प्रमाण, छपाईच्या खर्चात होणारी वाढ, दिवाळी अंकांच्या वाचकांची कमी होणारी संख्या आदी तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात.

मात्र, या अडचणींतून देखील वाचकांपर्यंत दिवाळी अंक पोहोचण्यासाठी लेखक, प्रकाशकांकडून अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. मुख्यत: वाचन वर्ग वाढवण्यासाठी प्रकाशकांकडून “ऑनलाइन’ अंक प्रकाशित केला जातो. सध्या “ट्रेन्डी’ असणाऱ्या “डिजिटल’ आणि “ऑडिओ’ अंकांमुळे वाचकांना त्यांच्या आवडीचे दिवाळी कोठेही, केव्हाही वाचता आणि ऐकता येणार आहेत.

अनेकांना दिवाळी अंक वाचण्याची इच्छा असूनदेखील वेळेअभावी वाचता येत नाहीत. छापील आणि डिजिटल अंकासाठी वेळ आवश्‍यक आहे. परंतु “ई-बुक्‍स’ काम करताना सहज ऐकू शकतो. यामुळे वेळ वाचतो आणि अन्य कामेदेखील होतात. पर्यायाने दिवाळी अंक “ऑनलाइन’ असल्यास अधिकाधिक वाचकांना वाचता येईल.
– पराग वाघमारे, वाचक

Leave A Reply

Your email address will not be published.