पुणे – वाढत्या उन्हाच्या चटक्याचा फटका महापालिकेच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयालाही बसला असून उन्हामुळे सुट्टीत प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या २० ते २५ टक्के रोडावली आहे.
प्राणी संग्रहालयाचा परिसर मोठा असल्याने चालत फिरताना दमछाक होत आहे. सकाळीही उन्हाचा चटका असल्याने पर्यंटकांची संख्या घटल्याचे निरीक्षण प्रशासनाने वर्तवले आहे. दरम्यान, उन्हाळ्यामुळे येथील प्राण्यांसाठी पाण्याचे फवारे, कूलर तसेच त्यांचे खंदक थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
उन्हाळी सुट्टयांमध्ये दरवर्षी कात्रज उद्यानात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. प्रामुख्याने शनिवारी- रविवारी संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या २० ते २५ हजारांपेक्षा अधिक असते. मात्र, आता शनिवार रविवारीही सरासरी १५ हजार पर्यटक येत असल्याचे संग्रहालय प्रशासनाने सांगितले.
बॅटरीवरील वाहनांना प्राधान्य
या प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यंटकांना फिरण्यासाठी बॅटरीवरील वाहने उपलब्ध आहेत. उन्हामुळे बहुतांश पर्यंटक या वाहनांनाच प्राधान्य देत आहेत. संग्रहालयाचा परिसर मोठा असल्याने उन्हात फिरताना त्रास टाळण्यासाठी अनेक पर्यटक सायंकाळी ४ नंतर उन्हाचा चटका कमी झाल्यानंतर संग्रहालयात येत आहेत.