पुणे – दररोजच्या जेवणात महत्त्वाचा घटक असणाऱ्या डाळींची भाववाढ होणे सुरूच आहे. मागील महिनाभरात तूरडाळ किलोमागे १५, तर मुगडाळ १० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या ताटातून या दोन्ही डाळी गायब होणे सुरू झाले आहे.
मागील मान्सून हंगामात राज्यात कमी पाऊस झाला. त्याचा फटका अन्य पिकांसह डाळींच्या उत्पादनालाही सला. त्यामुळे बाजारात नोव्हेंबरनंतर आवक होऊनही तूर, मुग आणि उडीद डाळींचे भाव सध्या तेजीत असल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगासह चणा, मसूर आणि वाटाणा डाळींची भाववाढ होणे सुरू झाले आहे. राज्यात तुरीचे उत्पादन प्रामुख्याने विदर्भात अकोला, यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये घेतले जाते.
तेथील बाजारात तुरीची मागणी कायम असून, निर्यातदेखील सुरू आहे. पण, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असून, शहरी भागांतील ग्राहकांना डाळींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, काही देशांना भारतातून डाळींची निर्यात केली जाते. त्या देशांकडून साठवणूक वाढली आहे. तसेच गुजरातमधील व्यापाऱ्यांनी तूरडाळ जास्त खरेदी केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही प्रमाणात तूट निर्माण झाल्याचे निरीक्षण व्यापारी संघटनांनी नोंदवले आहे.
मार्चमधील डाळींचे भाव (घाऊक बाजार)
तूर : १२० ते १४० रुपये प्रतिकिलो
मूग : ९० ते १०० रुपये प्रतिकिलो
चणाडाळ : ८० ते ९० रु. प्रति किलो
मसूर डाळ : ८० ते ९० रु. प्रति किलो
एप्रिलमधील डाळींचे भाव (घाऊक बाजार)
तूर : १४० ते १७० रुपये प्रतिकिलो
मूग : १४० ते १५० रुपये प्रतिकिलो
चणाडाळ : ९० ते १०० रु. प्रति किलो
मसूर डाळ : ८० ते ९० रु. प्रति किलो
साठेबाजांवर आळा घालणे आवश्यक
सध्या डाळींचे भाव जास्त असल्याने किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करतात. सध्या ही डाळ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा कल आहे. सध्या डाळींचा तुटवडा नसला, तरी साठेबाजांवर आळा घालणे आवश्यक आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.