मुंबई – भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य कलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यभरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच पडळकर दिसतील तिथे त्यांना चोप देऊ अशाही संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत.
दरम्यान पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.”
पडळकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार नाही याची काळजी घायलाच हवी, असे रोहित पवार म्हणाले.
काय आहे प्रकरण?
धरनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
बीडमध्ये पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला –
पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. पडळकर यांच्या याच वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तसेच, भाजपने तात्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही –
पुण्यातील कार्यकर्त्यांनी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने फाटा येथे आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ, अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली.