तेल अवीव – गाझामध्ये इस्त्रायलकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय अर्थात आयसीसी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करू शकते अशी शक्यता बोलली जाते आहे. दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांनी यासंदर्भात आयसीसीमध्ये याचिका दाखल केल्या आहेत. (Israel fears ICC will issue arrest warrants for Netanyahu and other top officials)
दरम्यान, टाइम्स ऑफ इस्त्रायलमध्ये रविवारी एक बातमी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार इस्त्रायलचे सरकार नेतान्याहू आणि अन्य अधिकाऱ्यांच्या संभाव्य अटकेचे वॉरंट रोखण्याचा प्रयत्न करते आहे. आयसीसीकडून वॉरंट काढले जाण्याची कुणकुण त्यांना लागली असल्यामुळे त्यांनी ते रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
इस्त्रायलची राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि परराष्ट्र मंत्रालय वॉरंट रोखण्यासाठी सक्रिय झाले आहे. गाझा पट्टीत पॅलेस्टीनींना उपाशी ठेवण्यात आले या करण्यात आलेल्या आरोपावर आयसीसीचा प्रमुख भर आहे. त्या आधारावरच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
इस्त्रायलचे पत्रकार बेन कॅस्पिट यांच्या म्हणण्यानुसार अटकेच्या संभाव्य कारवाईमुळे नेतान्याहू आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सातत्याने फोनाफोनी सुरू आहे. या सगळ्या फोनचा केंद्रबिंदू अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारीही नेतान्याहू यांनी एक पोस्ट टाकली होती.
माझ्या नेतृत्वाखाली इस्त्रायल आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकारांचे संरक्षण करेल आणि तो अधिकार दुबळा होऊ देणार नाही. आयसीसीचा कोणताही प्रयत्न आम्हाला अमान्य असेल. सैनिक आणि अधिकाऱ्यांना अटक करण्याची धमकी अपमानजनक आहे. आम्ही त्यापुढे झुकणार नाही असे नेतान्याहू यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्त्राइल काटज् म्हणाले अटक वॉरंट काढण्याची कृती आयसीसी करणार नाही अशी अपेक्षा आम्ही करतो. अटकेचा आदेश जारी केला तर त्यामुळे इस्त्रायलचे कमांडो आणि अधिकाऱ्यांचे नुकसान होइल आणि हमास ही दहशतवादी संघटना आणि इराणच्या नेतृत्वाखालील कट्टरवाद्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या विरोधातच आम्ही लढत आहोत असे काट्ज यांनी म्हटले आहे.