करोना व्हायरसने संपूर्ण जगात कहर केला असून या विषाणूपासून वाचण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहे. त्यातच सर्वजण आपापल्या देशात आणि घरात सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवुड अभिनेत्री सौंदर्या शर्मा ही सध्या यूएसएमध्ये असून मायदेशी परतण्यासाठी तिने भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
अभिनेत्री सौंदर्या शर्मा सध्या लॉस एंजिलीस येथे आहे. करोनाच्या या महामारीत ती भारतात परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. सौंदर्या म्हणाली, सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. या संकटकाळात शेकडो विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिक अडचणींचा सामना करत आहे. लॉकडाउन वाढल्याने त्यांना आर्थिक टंचाईसह अन्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सौंदर्या म्हणाली, मी भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. त्यांना येथील अडचणी सांगितल्या असून येथून मायदेशी परत येण्यासाठी विनंती केली आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच येथील अडचणीत असलेल्या भारतीयांना मदतही मिळत नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे तिने सांगितले.