पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेतल्या जात असलेल्या बेकायदेशीर नियमांचे आता नवे-नवे उच्चांक गाठण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार आता तांत्रिक विभागात कार्यरत असलेले सह-शहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
हा निर्णय राजकीय दबावातून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करतानाच महापालिकेच्या आकृतीबंधालाही हरताळ फासला गेला आहे. या निर्णयामुळे कायद्यापेक्षा राजकीय हस्तक्षेप आणि दबावच मोठा झाल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत. यातील दोन पदे हे शासन नियुक्त तर तिसरे पद हे महापालिकेच्या सेवेतील व्यक्तीला पदोन्नतीने देण्यासाठी राखीव आहे. या पदासाठी शासनाने 6 जानेवारी 2015 रोजी आदेश काढून पदनामावली, अनुभव आणि अतिरिक्त आयुक्तासाठी लागणारी अर्हता स्पष्ट केलेली आहे. हे पद उपायुक्त अथवा महापालिका अधिनियमातील कलम 45 मध्ये समाविष्ट पदांमधून भरावे, असे स्पष्ट आदेश आहेत.
यामध्ये उपायुक्त, सहायक आयुक्त, नगरसचिव, आरोग्य अधिकारी व शहर अभियंता यांचा समावेश आहे. या पदावर कार्यरत प्रत्येक व्यक्ती हा पदवीधर आहे. मात्र, महापालिका सध्या ज्यांच्यावर अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोपविणार आहे, ते तुपे पदविकाधारक (डिप्लोमा) आहेत. त्यामुळे शासन आदेशाची पायमल्ली होत आहे.
महापालिकेच्या आकृतीबंधामध्येही पदोन्नती देताना प्रशासकीय व्यक्तीला तांत्रिक अथवा तांत्रिक पदावर कार्यरत व्यक्तीला प्रशासकीय पदांवर पदोन्नती देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले असतानाही हा निर्णय घेतला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत या पदासाठी सध्या तिघे जण प्रयत्नात आहेत.
यामध्ये सहायक आयुक्त आशा दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर आणि नगरसचिव उल्हास जगताप यांचा समावेश आहे. हे तिघेही प्रशासकीय सेवेतेतील असून या पदासाठी लागणारा दहा वर्षांचा अनुभव कमी पडत असल्यामुळे त्यांना या पदाचा कार्यभार देण्यास नकार देण्यात आला आहे. यातील चंद्रकांत इंदलकर यांनी विविध पदांवर काम करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. तर, नगरसचिव उल्हास जगताप यांनीही आपल्या कार्यातून विशेष चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही पदोन्नतीऐवजी पदभार मागितल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून तुपे यांच्यावर राजकीय दबावातून मर्जी दाखविण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्ती
प्रविण तुपे हे सध्या विद्युत विभागाचे सह-शहर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार द्यावा, यासाठी त्यांनी नुकताच राजीनामाही दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा मागे घेण्यास सांगून त्यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात येत आहे. तुपे हे फेब्रुवारी 2021 मध्ये महापालिका सेवेतून निवृत्त होत आहेत.
राजकीय दबावातून निर्णय
प्रविण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोपवावा, यासाठी राजकीय दबाव असल्याचेही समोर आले आहे. या दबावातूनच हा निर्णय घेतला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे नियम, कायदे यापेक्षा राजकीय दबावातूनच महापालिकेत निर्णय घेतले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांनाही शह
शहरामध्ये शह-काटशहाच्या राजकारणाची परंपरा आहे. हा निर्णयही त्यातूनच पुढे आल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर नुकतीच साहेबराव गायकवाड यांची शासनाने नियुक्ती केली होती. या नियुक्तीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र पदभार घेण्यापूर्वीच गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे शासनाकडून अथवा उपमुख्यमंत्र्यांकडून इतर अधिकारी या पदावर पाठविण्यापूर्वीच हा निर्णय घेऊन अजित पवार यांनाही शह दिला जाणार आहे.