अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधले हाती शिवबंधन

मुबंई : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

दीपाली सय्यद यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांना कळवा मुंब्रयातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तसेच याची घोषणाही लवकरच केली जाईल, असे म्हटले जात आहे. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सलग दोन वेळा या ठिकाणाहून निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, या ठिकाणी शिवसेना कोणाला उमेदवारी देईल यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

या ठिकाणाहून शिवसेनेच्या प्रदीप जंगम, राजेंद्र साप्ते आणि सुधीर भगत आदींची नावे आघाडीवर होती. दीपाली सय्यद या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. जत्रा, ढोलकीच्या तालावर, उचला रे उचला, लाडीगोडी, मुंबईचा डबेवाला, करायला गेलो एक, मास्तर एके मास्तर या आणि अशा अनेक सिनेमांतून त्यांनी काम केलं आहे. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीच्या वेळी आम आदमी पार्टी अर्थात आपच्या तिकिटावर त्यांनी अहमदनगरमधून निवडणूक लढवली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.