पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्याधुनिक करताना पीएमपी प्रशासनाकडून विविध प्रयेाग केले जात आहेत. यामध्ये ऑनलाइन तिकीट सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन तिकीटाच्या मशीन्स सातत्याने बंद पडत असल्याने वाहकांना अशा मशिनसह कागदी तिकीट-ट्रे बाळगावा लागत आहे. त्यातच पैसे असलेली पिशवीही असल्याने पीएमपी वाहकावर जड झाले ओझे, अशी स्थिती उद्भवली आहे.
पीएमपीच्या ऑनलाइन तिकीट विक्री मशीन्समध्ये सातत्याने बिघाड होणे, ग्रामीण भागात गेल्यानंतर इंटरनेट अभावी मुशीन सुरू न होणे, रेंज अभावी युपीआय पेमेंट न होणे, तिकीट व्यवस्थित प्रिंट न निघणे, कोरी तिकीटे निघणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे आनलाइन तिकीट विक्रीत मोठ्या अडचणी येत आहेत, याचा परिणाम म्हणून वाहकांना एकच काम दोन वेळा करावे लागत आहे.
ऑनलाइन पेमेंट जमा होत नसल्याने हिशेब देताना वाहकांना त्याचा फटका बसत आहे. अनलाइन तिकीटाची खात्री नसल्याने कागदी तिकीट द्यावे लागत आहे. रेंज अभावी स्कॅन कोड प्रक्रियाही बेभरवशी असल्याने वाहकांचे प्रवाशांची वाद होत आहेत. यावर पर्याय म्हणून प्रवाशांना कागदी तिकीट देण्यावरच वाहकांचा भर आहे.
ई-तिकीटतील अडचणी…
– पेपर रोल खराब दर्जामुळे प्रिंटिंगमध्ये त्रुटी
– मशीन बंद पडण्याचे प्रमाण अधिक
– मशीन्सची सर्विसिंग आणि रिपेअरिंग वेळेवर नाही
– वाहकांच्या तुलनेत सुरळीत मशिन्सची संख्या कमी
“ऑनलाइन तिकीटाच्या मशिन्सच्या तक्रारीवर आम्ही सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. अनेकवेळा इंटरनेटची अडचण असल्याने या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही यावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देवू.” – सतिष गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी