पुणे– पुणे येथून अयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ती कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्या दरम्यान अतिरिक्त चार उन्हाळी विशेष ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-अयोध्या (ट्रेन क्रमांक ०१४५५) उन्हाळी विशेष गाडी पुण्याहून ३ मे रोजी सोडण्यात आली. तर दि. 7 मे रोजी आणखी एक ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी अयोध्या येथे सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.
तर अयोध्या-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४५६) उन्हाळी विशेष गाडी अयोध्येहून ५ मे आणि ९ मे रोजी दुपारी ४ वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, ओराई, कानपूर आणि लखनौ या स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.