पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या मूल्यमापनाचा निकाल येत्या सोमवारी (दि.६) लावण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता ५ वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता ८ वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १२ मार्च,२०२४ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला संकेतस्थळावर माहितीची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता ५ वी, ८ वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली आहे.