लिफ्ट सावकाश झाल्याने वेळेत पोहचता न आल्याचे कारण
पिंपरी – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज गुरुवारी दाखल होणार होते. त्यापैकी भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रशांत शितोळे यांच्या “घड्याळा’ची वेळ मात्र चुकली. लिफ्ट थांबत-थांबत गेल्यामुळे ते तीन मिनिटे उशीराने पोहोचल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत मतदारसंघत वेगवेगळ्या चुरस चर्चा रंगू लागल्या आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजप व महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. एकीकडे भाजप शक्तीप्रदर्शन करीत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र गारठल्याचे दिसून आले. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले.
उमेदवारी अर्ज भरायला काही मिनीटे शिल्लक असताना ते कार्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी, घाईघाईने लिफ्टमधून सातव्या मजल्यावरील कार्यालयात जात असताना सगळ्या मजल्यावर थांबत गेली. सावकाश लिफ्ट गेल्याने अर्ज भरण्याची दुपारी तीन वाजण्याची मुदत संपून गेली. त्यामुळे, त्यांना आज अर्ज न भरताच परतावे लागले. आज शितोळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त खरचं हुकला की हुकवला याबाबत वेग-वेगळी चर्चा रंगू लागल्या आहेत. शितोळे उद्या शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भाजपची गर्दी आणि लिफ्टमुळे उशीर – शितोळे
भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप हे अर्ज भरावयास आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. गर्दीतून वाट काढत आतमध्ये जाण्यास काही वेळ लागला तसेच कार्यालय सातव्या मजल्यावर असल्यामुळे लिफ्तमधून आम्ही वरती गेलो. सात मजले जात असताना ही लिफ्ट सर्वच मजल्यावर थांबत-थांबत गेल्याने तीन मिनिटे उशीर झाला, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
नगरसेवकांची गैरहजेरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रशांत शितोळे यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाने गुरुवारी त्यांचा अर्ज भरण्यात येणार होता. शहरात राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक व 2 स्वीकृत सदस्य आहेत. यातील बहुतांश नगरसेवकांनी अनुपस्थिती लावली. केवळ शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर व स्विकृत सदस्य भाऊसाहेब भोईर यांच्यासह बोटावर मोजण्याइतपच पदाधिकारी उपस्थित होते.